रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातून एक अत्यंत चटका लावणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. चुलीवरून कुकर उतरवत असताना अचानक चक्कर आल्याने कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून गंभीररीत्या भाजलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (वय २३ वर्षे, सध्या रा. नाखरे, मूळ रा. कर्नाटक) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ही रत्नागिरी तालुक्यातील बोरभाटले-नाखरे येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. घरात चुलीवर स्वयंपाक सुरू असताना, कुकरमध्ये डाळ शिजल्यानंतर ती कुकर खाली उतरवत होती. मात्र, त्याच वेळी तिला अचानक चक्कर आली. चक्कर आल्यामुळे तिचा स्वतःवरील ताबा सुटला आणि हातातील कुकर खाली पडला. कुकरमधील कडकडीत गरम डाळ थेट तिच्या तोंडावर, हनुवटीवर आणि दोन्ही हातांच्या मनगटावर उडाली. या अपघातात ती गंभीररीत्या भाजली होती.
प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेले, पण…
घटनेनंतर सुरुवातीला तिचे वडील हल्लेपा सिद्रमाप्पा बुदीहल यांनी तिच्यावर घरीच प्राथमिक उपचार केले होते. मात्र, बुधवार दिनांक १३ मे रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास लक्ष्मीच्या जखमांच्या वेदना अधिकच वाढल्या. वेदना असह्य झाल्याने तिची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध पडली.
तिची अवस्था पाहून कुटुंबीयांनी तिला तातडीने लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी तिला ‘१०८’ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवण्यास सांगितले. मात्र, दुर्दैवाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुपारी २:२५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला तपासून ‘मृत’ घोषित केले.
रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंद
या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १७/२०२६) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. स्वयंपाकघरात काम करताना अचानक आलेल्या चक्करीमुळे एका तरुण मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने नाखरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 16-05-2026













