Sangmeshwar: तळेकांटे बाव नदी पुलाजवळ दोन पिकअप गाड्यांमध्ये जोरदार धडक; एकजण गंभीर

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये अत्यंत भीषण अपघात झाला आहे. महामार्गाचे काम सुरू असताना एका चालकाने बेदरकारपणे चुकीच्या दिशेने (रॉन्ग साईड) वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली. या धडकेत एक चालक गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना सोमवार दिनांक ११ मे रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

एकमार्गी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ सध्या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे प्रशासनाने वाहतूक एकमार्गी (वन-वे) केली आहे. अपघात घडवला तो आरोपी चालक आशिष प्रदीप खरसे (वय २७ वर्षे, रा. गिर्ये, देवगड) हा आपली बोलेरो पिकअप (क्र. MH-07-AJ-4754) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता.

या वेळी रस्त्यावरील परिस्थिती आणि वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आशिषने आपले वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चुकीच्या बाजूला नेले. त्याच वेळी समोरून म्हणजेच गोव्याच्या दिशेकडून येणाऱ्या दुसऱ्या बोलेरो पिकअपला (क्र. MH-08-H-7929) या कारने उजव्या बाजूने अत्यंत जोरात धडक दिली.

चालक गंभीर जखमी; गाडीचे मोठे नुकसान

या भीषण धडकेत समोरून येणाऱ्या पिकअपचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे चालक चंद्रशेखर तारासिंग जाधव (वय ४० वर्षे) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तर त्यांच्या शेजारी बसलेले साक्षीदार राज जाधव यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. जखमींवर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.


देवगडच्या चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदेश सिताराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या बाजूने निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी चालक आशिष खरसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 16-05-2026