चिपळूण: चिपळूण तालुक्यातून एक धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आबलोली ते वहाळफाटा मार्गावरील निवळी स्टॉपजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगात वॅगनआर कार चालवणाऱ्या एका चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार व्यापारी गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री ९:५० वाजण्याच्या सुमारास घडली.
विरुद्ध दिशेने येत कारने दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग सुरेंद्र सुर्वे (वय ३९ वर्षे, रा. निवळी कोंडवाडी) हे आपल्या मालकीची मोटरसायकल (क्र. MH 08 AY 0182) घेऊन आबलोली-वहाळफाटा रस्त्याने घराच्या दिशेने जात होते. ते निवळी स्टॉपजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या वॅगनआर कारने (क्र. MH 02 EP 0478) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
अपघाताच्या वेळी कार चालक सूर्यकांत दत्ताराम लाड (वय ५६ वर्षे, रा. ढाकमोली) हा पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कार विरुद्ध दिशेला (रॉन्ग साईड) आणली आणि समोरून येणाऱ्या सुर्वे यांच्या दुचाकीला उडवले. या भीषण धडकेमुळे सुयोग सुर्वे हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
कार चालकाविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. याप्रकरणी जखमी सुयोग सुर्वे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कार चालक सूर्यकांत लाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०२६ नुसार नोंद करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
कोकणातील रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 16-05-2026













