कोंडगाव तिठ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराला अखेर तोडगा

साखरपा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रस्ता रुंदीकरणामुळे हलवावा लागणार असल्याने, पुतळ्याच्या नवीन ठिकाणासाठी रविवारी कोंडगाव ग्रामपंचायत येथे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवप्रेमींची सभा झाली.

सभेत विविध पर्यायांवर चर्चा होत असताना पुतळा सध्या ज्या खाजगी जागेत (संकेत हटिल परिसर) आहे, त्या जागेचे मालक संजय गांधी यांनी आमदार सामंत यांच्या विनंतीचा मान राखून पुतळ्यासाठी चार फुटांची जागा देण्याची घोषणा केली. त्यांनी मात्र या पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी अट ठेवली. आमदार सामंत यांनी शासनाकडे याबाबत विनंती करण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयामुळे परिसरात शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. आमदार सामंत यांनी संजय गांधी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या बैठकीला पंचायत समिती, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस विभाग, रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे ठेकेदार रवी इन्फ्रा प्रतिनिधी, कोंडगाव सरपंच श्रद्धा शेट्ये, विलास चाळके, बापू शेट्ये, राजेश पत्त्याणे, संजय सुर्वे, बापू शिंदे, जया माने, विलास बेर्डे, राजेश कामेरकर, बापू लोटणकर, प्रसाद अपंडकर, ओंकार कोलते, अमित केतकर, किरण सप्रे, शिरूशेठ कबनूरकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 11/Aug/2025

Samarth gold