कला आणि नोकरीची हमी : मुंबई विद्यापीठाचा ‘बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ठरतोय गेम चेंजर

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेला ‘बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ (BPA) हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुंबई विद्यापीठातील असे शिक्षण देणारे हे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि इतर क्षेत्रांतील विषयांचा एकत्रित अभ्यास करून पदवी मिळवण्याची अनोखी संधी मिळत आहे.

हा अभ्यासक्रम केवळ नाट्य आणि संगीत या प्रमुख विषयांपुरता मर्यादित नाही. यात लेखन कौशल्य, सूत्रसंचालन, फाइन आर्ट्स, डिजिटल आर्ट्स, स्थानिक सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांसारख्या विविध कौशल्यांवर भर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रातही व्यावसायिक बनण्याची संधी मिळते. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने प्रात्यक्षिकांवर (Practical) आधारित असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट कामाचा अनुभव मिळतो.

बहुआयामी करिअरची संधी

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मायनर डिग्री म्हणून समाजशास्त्र विषय निवडण्याचा पर्याय असल्याने त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येतो. तसेच, एम.एस.डब्ल्यू. (MSW) सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही ते पात्र ठरतात. वाणिज्य शाखेतील मार्केटिंग विषय निवडल्यास त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये मिळतात. त्यामुळे आजच्या युगात विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवून त्यांना व्यावसायिक संधींसाठी तयार करणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांचे यश

या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले आहे. विद्यार्थिनी मनस्वी जाधव हिने इटलीमध्ये लोककला कार्यक्रमात सहभाग घेतला, तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत क्रमांक मिळाला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.

प्राचार्य डॉ. साखळकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक कौशल्ये वाढवून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी या यशस्वी वाटचालीत महाविद्यालयासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी परीक्षा मंडळाचे सदस्य आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. नंदकिशोर जुवेकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या दशावतार प्रशिक्षणासाठी विभागाच्या सहकार्याबद्दल 25,000/- चा धनादेश प्राचार्यांना सुपूर्द केला. या अनोख्या आणि यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरांतून विभागाचे अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 13/Aug/2025