भाजपसह निवडणूक आयोगाविरोधात चिपळुणात काँग्रेसकडून आंदोलन

चिपळूण : भारतातील काही राज्यांमध्ये मतदान व मतदार यादीत झालेल्या फेरफारीचा आरोप करीत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व सहकारी पक्षांच्या वतीने देशभर सुरू झालेल्या मत चोरी विरोधातील आंदोलनाचे पडसाद मंगळवारी (दि. 12) चिपळुणात उमटले. चिपळूण काँग्रेसच्या माध्यमातून बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात घोषणा देऊन निषेध केला.

देशभर सध्या निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात काँग्रेसने मतदार यादी व मतदान यामध्ये हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करून आरोप व टीका सुरू केली आहे तर या विषयाची धार अधिक वाढविण्यासाठी काँग्रेस पक्षाने सहकारी पक्षांसोबत म्हणजेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशभर जनआंदोलन उभे केले आहे. विविध ठिक़ाणी आंदोलने सुरू झाली असून चिपळुणात देखील काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात निषेध आंदोलन करून बहादूरशेख नाका येथे काही काळ चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी भाजप व केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करून मतांची चोरी झाली, मतदार याद्यांत फेरफार झाले त्या संदर्भात निवडणूक आयोगाने योग्य खुलासा व चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली असताना देखील त्याची दखल घेतली जात नाही. संविधानाने दिलेले अधिकार व लोकशाही संपविण्याचा प्रकार भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून करीत आहे. सर्वसामान्यांचे हक्क डावलून हुकूमशाही आणण्याचे कटकारस्थान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने सुरू केले आहे. या सर्वाचा निषेध करून विरोधकांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशा घोषणा देत आंदोलन केले.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक शौका काद्री, सफा गोठे, इब्राहिम दलवाई, प्रकाश पाथरे, सुरेश राऊत, निर्मला जाधव, श्रीमती जावकर, मकरंद जाधव आदींनी सहभाग घेत निषेध केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 13-08-2025