मंडणगडात १६ रोजी न्यायालय इमारतीचे उद्घाटन

मंडणगड : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळगावी मंडणगडात न्यायालय इमारतीचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेबांच्या गावी सुरू होत असलेल्या न्यायालयामुळे त्यांना एकप्रकारे अभिवादनच असल्याचे मानले जात आहे.

डॉ. आंबेडकर बॅरिस्टर होऊन भारतात आल्याला १०० वर्षे झाली. त्यानिमित्त ३ एप्रिल २०२३ रोजी अभिवादन सोहळ्याचे आंबडवे येथे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टर झाले.

३ एप्रिल १९२३ ला भारतात आले. या कार्यक्रमाची संकल्पना रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांची होती. त्या कार्यक्रमास महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, महाडचे अॅड. भिसे, माणगावचे अॅड, घायाळ, खेडचे अॅड. अभिजित गांधी, अॅड. मिलिंद लोखंडे उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव मंडणगड येथे न्यायालय त्वरित सुरू करण्याची मागणी प्रकषनि मांडण्यात आली. या अभिवादन सभेला आदी १५० वकील व खेड सिद्दयोग विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

पाठपुराव्यानंतर मंडणगडमध्ये न्यायालय सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. ७ नियमित व ३ सेवाबाह्य पदास मंजुरी देताना वार्षिक ७१७६३४० रुपये खर्चास मंजुरी दिली. ही मंजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आग्रह अँड. विलास पाटणे यांनीच धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत १६ ऑगस्ट रोजी उद्घाटन होत आहे. याचा अपूर्व आनंद आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी दिली.

७५ वर्षांनी मिळाला न्याय
न्यायालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन ऐतिहाससिक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एकप्रकारे अभिवादन आहे. या न्यायालयातून बाबासाहेबाना अपेक्षित असलेला न्याय गोरगरीब जनतेला मिळेल ही अपेक्षा आहे. बाबासाहेबांनी आणलेले हिंदू कोड बिल हे महिलांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता. कायद्याचे राज्य, मूलभूत अधिकार यासाठी बाबासाहेबांनी अविरत प्रयत्न केले. उशीर झाला परंतु अखेर स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मंडणगडच्या जनतेला न्याय मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 14/Aug/2025