रत्नागिरी : मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सक्षम करणे आणि बालविवाह रोखणे या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेचा जिल्ह्यातील २ हजार ४४७ मुलांना लाभ मिळालेला आहे.
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू असलेल्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख ३५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. लेक लाडकी योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून लेक लाडकी योजनेचा लाभ जवळपास सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
जुळ्या मुलींनाही लाभ मिळतो
या योजनेमध्ये दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लागू आहे. केवळ २ अपत्यांपर्यंत लागू आहे.
पाच टप्प्यांत एक लाखाची मदत मिळणार
या योजनेमध्ये पात्र मुलीला जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ५ टप्प्यांत एकूण १ लाख १ हजार रुपयांची मदत दिली जाते. जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता पहिलीत ६,००० रुपये, सहावीत ७,००० रुपये, अकरावीत ८,००० रुपये, वय वर्ष १८ पूर्ण झाल्यावर ७५,००० रुपये दिले जातात.
कुठे आणि कसा करायचा अर्ज ?
अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा. अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अशी आहे पात्रता
मुलगी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावी, कुटुंब पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी लागतात ही कागदपत्रे
मुलीच्या जन्म दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचे आणि मुलीचे आधार कार्ड, रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी), बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), शाळेचा दाखला (शिक्षण घेत असल्याचा पुरावा).
काय आहे ‘लेक लाडकी’ योजना
लेक लाडकी ही योजना राज्य शासनाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 14/Aug/2025












