राजापुरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची धडक कारवाई; तरुणावर गुन्हा दाखल

राजापूर : राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका तरुणावर राजापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तालुक्यातील खडपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दारू आणि दुचाकी असा एकूण ५१,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि. १३ ऑगस्ट २०२५) दुपारी १२:५५ च्या सुमारास, खडपेवाडी येथील हनुमान मंदिराजवळून गुजराळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजापूर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांना राजप्रतीक प्रमोद पाटकर (वय ३०, रा. खडपेवाडी) हा तरुण संशयास्पदरित्या थांबलेला आढळला.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो आपल्या ताब्यातील सुझुकी ऍक्सेस १२५ (MH 08 AU 7396) या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गोवा बनावटीची दारू लपवून तिची वाहतूक करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ गाडीची झडती घेतली. यावेळी डिक्कीमध्ये ‘हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी’ या गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या ३६ सीलबंद बाटल्या सापडल्या, ज्यांची किंमत १०८० रुपये आहे.

पोलिसांनी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ५०,००० रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई महेश बाबासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजप्रतीक पाटकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 14-08-2025