रत्नागिरी : शतकमहोत्सवी श्री राधाकृष्ण मंदिराला मंत्री नितेश राणेंची सदिच्छा भेट

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री, ना. नितेश राणे यांनी आज रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्री राधाकृष्ण मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. मंदिराच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

यावर्षी श्री राधाकृष्ण मंदिर आपले शंभरावे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करत आहे. या महत्वपूर्ण प्रसंगी मंत्री महोदयांनी मंदिराला भेट दिल्याबद्दल श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी बोलताना ना. राणे यांनी मंदिराच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजन मलुष्टे, उपाध्यक्ष श्री. वीरेंद्र वणजू, सेक्रेटरी श्री. मकरंद खातू, तसेच श्री. योगेश मलुष्टे, श्री. मिलिंद दळी, श्री. सतीश दळी, श्री. हेमंत वणजू, श्री. सौरभ मलुष्टे, श्री. गणेश भिंगार्डे, श्री. दादा दळी, आणि श्री. मनोर दळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शतकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘राधा कृष्ण’ स्पर्धेचे ना. नितेश राणे यांनी विशेषत्वाने अवलोकन केले. त्यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहानग्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे आयोजकांचा आणि स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.