रत्नागिरीतील व्यायामशाळा बंद होण्याच्या मार्गावर?

रत्नागिरी : आर्थिक दुर्बलतेमुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुसंख्य व्यायामशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुख्याधिकाऱ्यांसोबत व्यायाम शाळा चालवणाऱ्या मक्तेदारांसह प्रशिक्षकांची गुरुवारी चर्चा झाली. प्रशिक्षकांचे गेल्या सुमारे दोन वर्षाचे मानधन मिळालेले नाही. त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांनी गेल्या एप्रिलपासूनचे मानधन मिळू शकणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर ज्यांना व्यायामशाळा सुरु ठेवायच्या आहेत त्या प्रशिक्षकांनी त्या चालवून मानधन घेण्याची सूचनाही केली.

रत्नागिरी नगर परिषदेने मक्त्यावरील कर्मचाऱ्यांची २० टक्के कपातीचा निर्णय झाला. त्यानुसार विविध विभागातील ५५ कामगार कमी झाले. या कपातीत व्यायाम शाळा प्रशिक्षकांतील ८ पैकी २ प्रशिक्षक कमी होणार आहेत. नगर परिषदेच्या १३ व्यायाम शाळेत १३ प्रशिक्षक आहेत. मात्र मक्तेदाराला मानधन ८ प्रशिक्षकांचे मिळते ते कार्यरत १३ प्रशिक्षकांना दिले जाते. त्यात दोन वर्षापासूनचे मानधन मिळालेलेच नाही. प्रशिक्षक व्यायाम शाळेत येणाऱ्यांकडून दिडशे रुपये फी जमा करतात. ही फी नगर परिषदेकडे जमा केल्यानंतर मक्तेदाराचे बिल काढले जाते. त्यानंतर प्रशिक्षकांना मानधन मिळते.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी व्यायाम शाळा चालवणाऱ्या मक्तेदारांसह प्रशिक्षकांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी जितेंद्र विचारे, विजय कदम आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी जड अंतःकरणाने नगर परिषदेची आर्थिक स्थिती सांगून काही निर्णय सांगितले. व्यायामशाळा प्रशिक्षकांनी स्वतःहून चालवाव्या. मिळणाऱ्या फी मधून मानधन घ्यावे. व्यायामशाळेच्या एखाद्या मोठ्या दुरुस्तीच्या कामासाठी नगर परिषद मदत करील, परंतु छोटी-मोठी देखभाल दुरुस्ती, लाईट बील जबाबदारी प्रशिक्षकांनी घ्यावी.

न.प.च्या आर्थिक दुर्बलतेचा फटका
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याचे माहित झाल्याने व्यायामशाळा प्रशिक्षकांनी गणेशोत्सवानिमित्त ३ ते ४ महिन्याचे मानधन देण्याची विनंती केली. मुख्याधिकाऱ्यांनीही या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 15/Aug/2025