गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अँटी रॅगिंग विरोधी कायदा’ सप्ताहाचे उद्घाटन

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि जिल्हा विधी प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचा किमान समान कार्यक्रम म्हणून ‘अँटी रॅगिंग विरोधी कायदा’ सप्ताहाचे औचित्य साधून, महाविद्यालयातील आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या सहाय्याने ‘अँटी रॅगिंग विरोधी कायदा’ या विषयावरील उद्घाटनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव श्री. राजेंद्र पाटील प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग विरोधी कायद्याची माहिती दिली. तसेच अमली व मादक पदार्थांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे महत्त्व विषद करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत कशाप्रकारचे वर्तन करावे याची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी रॅगिंगसारखे प्रकार महाविद्यालयाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच अनुभवास आले नाहीत याची जाणीव उपस्थितांना करून दिली. त्यांनी महाविद्यालयातील अँटी रॅगिंग संदर्भातील उपयायोजनांची माहिती दिली. तसेच उपस्थितांना महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. मयुरेश पंडित, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. सुर्यकांत माने यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाला रत्नागिरीचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. बाळकृष्ण पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. सुर्यकांत माने यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:42 15-08-2025