खेड : लोटे एमआयडीसीत बेशिस्त पार्किंग; अपघातांना निमंत्रण

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीमध्ये येणाऱ्या मालवाहू वाहनांच्या विनापरवाना पार्किंगमुळे अपघातांच्या घटना वाढू लागल्या आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

आवाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत खासगी कंपन्या कार्यरत आहेत. त्या ठिकाणी दररोज शेकडो ट्रक, कंटेनर, टेंपोद्वारे कच्चा व तयार माल घेऊन ये-जा करत असतात; मात्र कंपनीत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ही वाहने वसाहतीअंतर्गत रस्ते, मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेने किंवा बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेत उभी केली जातात.

परिणामी, वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात, वादविवाद अशा घटना वारंवार घडत आहेत. सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या पार्किंग उल्लंघनावर तत्परतेने कारवाई करणारे पोलिस मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सतत केला जात आहे. तेथील सुरक्षारक्षक मुख्यालयाशी संपर्क करा, असा सल्ला देऊन भेट नाकारतात. त्यामुळे आवाशीमधील ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वेळीच लक्ष द्या…
वाहने उभी करण्याचा मुद्दा खूपच जुना आहे. तरीही त्यावर ठोस उपाययोजना न झाल्यामुळे स्थानिकांचा संयम सुटू लागला आहे. यावर संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे. अन्यथा, या विषयात आम्हाला लक्ष घालावे लागेल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 15/Aug/2025