मंडणगड : तालुक्यातील माहू गावातील शेतकरी कुटुंबातील मृणालिनी हुंबरे हिने आशिया खंडातील अग्रगण्य असणारे विद्यापीठ फुदान इंटरनॅशनल समर स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे माध्यमातून चीन शांघाय येथे पंधरा दिवसाचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला आहे. भारतातून यावेळी सहभागी झालेली ती एकमेव विद्यार्थिनी असल्याने या अभ्यासक्रमासाठी जगातून उपस्थित विद्यार्थ्यांशी भारताचा प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधला.
मृणालिनी सध्या केरळ राज्यातील केरळ अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, त्रिशूर या कृषी विद्यापीठात माती व पाणी संवर्धन, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि पाण्याचा शाश्वत वापर व साठवण करण्यासाठीच्या पद्धती या विषयात पीएच. डी. पूर्ण करत आहे. तिने दापोली येथे बी.टेक. पदवी संपादन केली असून, बिहार येथील समस्तीपूर येथून एम.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. सध्या तिचे पीएच.डी.चे संशोधन सुरू आहे. २० जुलैला तिने चीन शांघाय येथे जाऊन ७ ऑगस्टपर्यंत इव्होल्युशनरी अँड बायोलॉजिकल बिग डाटा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येने स्वतःचे धैर्य व धाडसाने चोखाळलेली वेगळी वाट अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आतापर्यंत तिने हैद्राबाद, केरळ, गुडगाव, मध्यप्रदेश अशा विविध राज्यांत प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 15/Aug/2025












