रत्नागिरी : शहरातील नाचणे परिसरात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयात धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सुमारे २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप कॉम्प्युटर (CPU) चोरून नेला आहे. ही घटना बुधवार (दि. १३ ऑगस्ट) रात्री ते गुरुवार (दि. १४ ऑगस्ट) रात्रीच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी उपविभागीय अभियंता योगेश नंजप्पा (वय ५५) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंजप्पा हे १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता कार्यालय बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी, १४ ऑगस्ट रोजी, कार्यालय उघडल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी उचकटून आतमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला होता.
कार्यालयाची पाहणी केली असता, टेबलावर असलेला १०,००० रुपये किमतीचा लेनोव्हो (Lenovo) कंपनीचा लॅपटॉप आणि १०,००० रुपये किमतीचा एचपी (HP) कंपनीचा डेस्कटॉप CPU गायब असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. योगेश नंजप्पा यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३४६/२०२५) दाखल केला आहे. भरवस्तीत असलेल्या शासकीय कार्यालयातच घरफोडी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 15-08-2025














