घर उघडे ठेवणे पडले महागात; निवेंडीत ज्येष्ठ महिलेच्या घरातून साडेतीन लाखांचे दागिने लंपास!

जयगड, रत्नागिरी : घरात कोणी नसताना घर उघडे ठेवणे एका ज्येष्ठ महिलेला चांगलेच महागात पडले आहे. तालुक्यातील निवेंडी-भगवती नगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख ५१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या अकरा दिवसांच्या कालावधीत घडली असून, जयगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अरुणा पर्शुराम घाग (वय ६२, रा. भगवती नगर, निवेंडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी घाग यांचे घर काही कारणास्तव उघडे होते. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतला. चोरट्याने घरात प्रवेश करून आतील खोलीतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. अनेक दिवसांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.

चोरट्याने कपाटातून सोन्याच्या बांगड्या, बदामाची नक्षी असलेल्या कर्णवेली, फुलांची नक्षी असलेली कानातील कुडी, लाल-पांढरे खडे असलेली कुडी आणि एक सोन्याची चपटी चेन असा एकूण ३,५१,९६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेनंतर अरुणा घाग यांनी गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) सायंकाळी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३१/२०२५) दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घरातून एवढ्या मोठ्या रकमेचे दागिने चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 15-08-2025