दापोलीतील ‘त्या’ ठरावास ठाकरे शिवसेनेचा विरोध

दापोली : दापोली नगरपंचायत भ्रष्टाचारमुक्त करण्याचा नारा देत आम्ही सत्तेत सामील झालो होतो. त्याप्रमाणे दापोली नगरपंचायतीत अपहार करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला; मात्र हा सर्व प्रकार ज्यांनी उघड केला त्यांनाच आता संबंधित कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता द्या, असे सांगावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले. तसेच सर्वसाधारण सभेत या विषयासंदर्भात झालेल्या चर्चेवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दापोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा १३ ऑगस्टला झाली. त्या सभेत दापोली नगरपंचायतीमधील निलंबित कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्या विषयावर महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी दापोलीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक एम. आर. शेट्ये, शहराध्यक्ष अॅड. खलील डिमटीमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कदम, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, महिला संघटक साक्षी कळसकर, ठाकरे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, शहराध्यक्ष संदीप चव्हाण, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, युवासेनेचे साईराज मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविकास आघाडीची दापोली नगरपंचायतीबाबत भूमिका मांडताना उबाठाचे तालुकाप्रमुख गुजर म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अपहार झालेले पैसे त्याच्याकडून वसूल करणे गरजेचे होते; मात्र ते न करता पक्षांतरानंतर ज्या नगरसेवकांनी अपहार उघड केला तेच आता निर्वाह भत्ता देण्यासाठी आग्रही आहेत. हे दुर्दैव असून, संबंधित कर्मचारी नगरपंचायतीमधील कंत्राटी कर्मचारी आहे. त्यामुळे त्याला निर्वाह भत्ता देणे गरजेचे आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. तसेच त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता देण्याविषयी औद्योगिक न्यायालयाचा निर्णय झाला आहे. त्याबाबत अपील होणे गरजेचे होते; मात्र नगरपंचायतीने तसे केले नाही, असे त्यांनी सांगितले.

सफाई कर्मचारी, चार महिने बिनपगारी
दापोली नगरपंचायतीत सफाई करणारे तसेच अन्य कर्मचारी जे सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना गेले चार महिने पगार दिला गेलेला नाही; मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी नगरसेवकांना निलंबित कंत्राटी कर्मचाऱ्याच्या निर्वाह भत्त्याची चिंता लागली आहे, अशी टीकाही गुजर यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 15/Aug/2025