देवरूख, रत्नागिरी : ज्या तरुणीवर विश्वास ठेवून वृद्ध सासूच्या सोबतीसाठी घरात ठेवले, तिनेच डाव साधत घरातील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार देवरूखमध्ये उघडकीस आला आहे. ही घटना मे महिन्यात घडली असली तरी, घरमालकिणीने स्वतः तीन महिने सखोल चौकशी करून आणि भक्कम पुरावे गोळा करून संशयित तरुणीविरोधात देवरूख पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी देवरूख येथील केशवसृष्टी परिसरात राहणाऱ्या सौ. नेहा संतोष जोशी (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याच घरात पेइंग गेस्ट म्हणून राहणारी समृद्धी संदीप लवटे (वय २५, मूळ रा. सांगली) हिच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ आणि ६ मे रोजीच्या रात्री घडली. फिर्यादी नेहा जोशी या एका शिबिरासाठी देवरूख येथील पाध्ये शाळेत गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांच्या वयोवृद्ध सासू श्रीमती शालिनी जोशी एकट्याच होत्या. त्यांच्या सोबतीसाठी जोशी यांनी आपली पेइंग गेस्ट असलेल्या समृद्धीला घरी झोपण्यास सांगितले होते. ६ मे रोजी सकाळी ७ वाजता सौ. जोशी शिबिरातून परतल्या असता, त्यांना घराचा मुख्य दरवाजा आणि त्यांच्या बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला.
त्यांना संशय आल्याने त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, लाकडी कपाटाचे एक दार उघडे असल्याचे दिसले. त्यांनी कपाटातील जॅकेटची तपासणी केली असता, त्यात ठेवलेल्या दोन सोन्याच्या पाटल्या (किंमत ४,२०,००० रुपये) गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तीन महिने स्वतः केला तपास
दागिने सापडत नसल्याने सौ. जोशी यांनी सुरुवातीला घरात आणि पतीच्या सल्ल्यानुसार सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, दागिने न सापडल्याने त्यांचा संशय पेइंग गेस्ट समृद्धीवर बळावला. त्यांनी पोलिसांत जाण्यापूर्वी स्वतःच तपास करायचे ठरवले. समृद्धी यापूर्वी ज्या ठिकाणी भाड्याने राहत होती, तेथे जाऊन त्यांनी तिची माहिती घेतली. तिच्या वर्तणुकीबद्दल आणि पार्श्वभूमीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर, तिनेच ही चोरी केली असल्याची त्यांची ठाम खात्री झाली. त्यानंतर चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या खरेदी पावत्यांसह त्यांनी गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) देवरूख पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली.
या प्रदीर्घ विलंबाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी समृद्धी लवटे हिच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ९३/२०२५) दाखल केला आहे. विश्वासाने घरात आसरा दिलेल्या व्यक्तीनेच केलेल्या या चोरीमुळे देवरूख परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 15-08-2025














