डॉ. उमामहेश्वर यांनी साधला काव्यप्रतिभा, बुद्धिचातुर्य, स्मरणशक्ती इ.‌आठ क्षमतांचा आविष्कार

रत्नागिरी : एकाच वेळी शीघ्र काव्य रचणे, दिलेल्या विषयावर एकेक चरण रचून काव्य करणे, मध्ये मध्ये विचारल्या जाणाऱ्या अप्रस्तुत प्रश्नांना उत्तरे देणे, विचारलेल्या कोणत्याही श्लोकाचे विवेचन करणे, कुठेही न बघता फक्त बुद्धिमत्तेने उभ्या व आडव्या संख्यांची एकच बेरीज करून दाखवणे अशा आठ क्षमतांचा आविष्कार अष्टावधानी डॉ. उमामहेश्वर ना. यांनी साकारला. निमित्त होते संस्कृत भारतीने आयोजित केलेल्या संस्कृत सप्ताहातील अष्टावधान कार्यक्रमाचे. अवधानी डॉ. उमामहेश्वर ना. यांची प्रचंड विद्वत्ता पाहून रत्नागिरीकरही थक्क झाले. हा सर्व संवाद संस्कृतमध्ये झाला तरीही रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद या उपक्रमाला लाभला.

झाडगाव येखील माधवराव मुळे भवनात हा कार्यक्रम जवळपास चार तास रंगला. अष्टावधान कार्यक्रमाचे उद्घाटन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी दीपप्रज्वलनाने केले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त), प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर (टेक्निकल) रामबाबू सांका, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, संस्कृत विभागप्रमुख, उपप्राचार्य तथा संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. संस्कृत सप्ताहाची सांगता अष्टावधान कार्यक्रमाने झाली. या प्रसंगी मान्यवरांनी भाषणामध्ये या उपक्रमाचे कौतुक करून नेहमीच लागणारे सहकार्य करू असे सांगितले.

बंगलोर येथील डॉ. उमामहेश्वर ना. अवधानी म्हणून उपस्थित होते. तर प्रच्छक म्हणून महाबलभट्ट (अप्रस्तुतप्रसंग), डॉ. दिनकर मराठे (आशुकाव्य), डॉ. कल्पना आठल्ये (संख्याबंध), सौ. योगिता केळकर (निषिद्धाक्षरी), मयुरी जोशी (दत्तपदी), चैतन्य पाडळकर (समस्यापूर्ती), राजेश कुमार (चित्रकाव्य) आणि कु. मैत्रेयी आमशेकर (काव्यवाचन) सहभागी झाले.

अष्टावधान कला भाषेच्या विविधांगी अभ्यासाचा उत्तम आविष्कार असल्याचे डॉ. उमामहेश्वर यांनी दाखवून दिले. डॉ. उमामहेश्वर यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, उत्तम धारणाशक्ती, स्मरणशक्ती, काव्यरचनेचे सामर्थ्य आणि हजरजबाबीपणा अनुभवता आला. ते कुठेही गोंधळलेले दिसले नाहीत. चेहऱ्यावर नम्रता आणि प्रत्येकाच्या प्रश्नांना न रागावता समर्पक उत्तरे दिली, त्यामुळे उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.

चार फेऱ्यांमध्ये अष्टावधान कार्यक्रम रंगतदार झाला. यामध्ये निषिद्धाक्षरीमध्ये सौ. केळकर यांनी ग, र, म आदी वेगवेगळी अक्षरे वगळून काव्य करण्याची अट घातली. त्यानंतर डॉ. उमामहेश्वर यांनी सुरेख काव्य केले. पहिल्या काव्यामध्ये शब्द सुचताना त्यांना अनेक व्यवधाने पाळावी लागली. एकेका फेरीत कडवे रचत चौथ्या फेरीत त्यांनी चार कडव्यांचे काव्य पूर्ण केले.

समस्यापूर्तीत चार भागांपैकी एक भाग दिला व उरलेले तीन दिलेल्या भागाला सुसंगत पद्धतीने रचले. दत्तपदी या प्रकारामध्ये मयुरी जोशी ऑपरेशन सिंदूर या विषयावर ठो, ठो, ढम् ढम्, कल कल, आव आणणे असे शब्द दिले होते. त्यावर डॉ. उमा महेश्वर यांनी युद्धजन्य स्थिती, बाँब वर्षाव करणारी भारतीय विमाने व वर्णन करणारे काव्य रचले. या काव्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

आशुकाव्यामध्ये डॉ. मराठे यांनी विचारल्यानुसार हरिणी वृत्तामध्ये काव्य सादर केले. चित्रकाव्यामध्ये हारबंध म्हणजे फुलांच्या पाकळ्यांमध्ये शब्दरचना करत श्रीलो भालो.. हे धन्वंतरिस्तुती हारबंध काव्य डॉ. उमामहेश्वर रचले. ही रचना फलकावर त्या बंधाच्या आकृतीसह लिहून प्रेक्षकांना दाखवण्यात आली. डॉ. उमामहेश्वर यांच्या या विद्वत्तेवर रत्नागिरीकर अतिशय खुष झाले.
कु. मैत्रेयी आमशेकर हिने सुरेल आवाजात नाटकातील पद्ये, ग्रंथांमधील श्लोक सादर केले. त्याचे विस्तृत विवेचन डॉ. उमामहेश्वर यांनी केले. भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक सांगताना त्यांनी प्रत्येक संस्कृत अभ्यासकाने हे वाचण्याची विनंती केली.

डॉ. कल्पना आठल्ये यांनी भगवद्गीतेमधील भगवान् श्रीकृष्णांच्या श्लोकांची संख्या ५७४ असल्याचे सांगून हा संख्याबंध ५०५ तक्त्यामध्ये बसवण्यासाठी प्रश्न विचारले. चार फेऱ्यांमध्ये उभ्या व आडव्या संख्येची बेरीज ५७४ करण्याचे मोठे आव्हान डॉ. उमामहेश्वर यांनी लीलया पेलले. विशेष म्हणजे न बघताच हे गणित सोडवायचे होते. फलकावर कोणत्या ठिकाणी संख्या लिहायची बाकी आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितले. यावरून त्यांची अतिप्रचंड बुद्धिमत्ता दिसून आली.

अप्रस्तुतप्रसंगातील अनेकविध प्रश्न महाबलभट्ट यांनी विचारून डॉ. उमामहेश्वर यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अष्टावधानी डॉ. उमामहेश्वर यांनी अतिशय रंजकतेने उत्तरे दिली. निद्रादेवीची प्रार्थना, कविकुलगुरु कालिदासाच्या उपमा, घरची आठवण येते का वगैरे अनेक प्रश्न विचारून महाबलभट्ट यांनी विनोद निर्मितीसाठी केली. डॉ. उमामहेश्वर यांची एकाग्रतेची कसोटी लागली.

रत्नागिरीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, डॉ. पां. वा. काणे संस्कृत उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, विविध शाळांच्या सहकार्यामुळे संस्कृत सप्ताहातील सर्व कार्यक्रम अतिशय सुरेखरित्या पार पडल्याचे महाबल भटट् यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले. तसेच दरवर्षी असे कार्यक्रम करण्याचे सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष आठवले यांनी सुरेख केले. डॉ. मराठे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:44 AM 16/Aug/2025