कोकण रेल्वे प्रवासी सुविधांसाठी खेडमध्ये लाक्षणिक उपोषण

खेड : कोकण विभागातील प्रवाशांच्या मागण्यांकडे गेल्या चार वर्षांपासून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ, जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी खेड रेल्वे स्थानकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.

या उपोषणादरम्यान प्रवाशांच्या काही महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडण्यात आल्या. यात रत्नागिरी पॅसेंजर गाडीला ४ डबे संगणकीकृत आरक्षणासाठी उपलब्ध करून देत ती दादरपर्यंत चालवावी, मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि करमाळी-एलटीटी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये रत्नागिरी रिमोट आरक्षण कोटा एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवावा, मांडवी एक्सप्रेस, मडगाव-एलटीटी, वांद्रे एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस या गाड्यांमध्ये सर्वच स्थानकांना समान कोटा द्यावा, अशी प्रमुख मागणी होती.

तसेच मुंबई-चिपळूण दरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअरकार आणि सामान्य अनारक्षित डबे असणारी गाडी सुरू करावी व दादर, ठाणे, पनवेल, पेण यांसह इतर स्थानकांना या गाडीचा थांबा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी कोकण रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात चर्चा करून या मागण्यांवर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर जल फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे लाक्षणिक उपोषण खेड स्थानकाबाहेर आयोजित करण्यात आले होते.

Tata altroz

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 16/Aug/2025