ठाणे, १५ ऑगस्ट २०२५ : ठाणे येथील विभागीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या अवघ्या साडेचार वर्षीय कु. परम दिनकर सावंत याने चमकदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे रत्नागिरीचे नाव जलतरण क्षेत्रात अभिमानाने चमकले आहे.
ठाण्याच्या पद्मश्री पद्मभूषण मिहिर सेन स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी, ५ ते १४ वर्षे वयोगटासाठी विभागीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेंतील ५ वर्षांखालील गटात रत्नागिरीचा ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कु. परम सावंत याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने २५ मीटर फ्री स्टाईल आणि ५० मीटर फ्री स्टाईल या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत दोन सुवर्णपदके जिंकली. विशेष म्हणजे, परम हा या स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला.
जी.जी.पी.एस. स्कूलचा विद्यार्थी असलेल्या परमने वयाच्या साडेतीन वर्षांपासून जलतरणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. ग्लोबल स्कूल स्विमिंग पूल येथील एस. एम. स्विमिंग कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या १३ महिन्यांपासून तो कठोर मेहनत घेत आहे. त्याचे प्रशिक्षक मनिषा बेडगे, संजय बेडगे आणि प्रथमेश बेडगे यांनी त्याच्याकडून विशेष तयारी करून घेतली होती.
परमच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक, त्याचे आई-वडील आणि संपूर्ण सावंत परिवाराचे मोलाचे योगदान आहे. त्याच्या पहिल्याच विभागीय स्पर्धेतील या देदीप्यमान विजयाबद्दल त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या लहानग्या जलतरणपटूने भविष्यातही अशाच प्रकारे यशाची शिखरे पादाक्रांत करावी, अशा शुभेच्छा त्याला दिल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 18/Aug/2025













