सकाळी १० वाजताचे पावसाचे अपडेट : जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दोन नद्या इशारा पातळीवर!

रत्नागिरी, १८ ऑगस्ट २०२५: रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. पाटबंधारे मंडळाच्या पूरनियंत्रण कक्षाने आज सकाळी १० वाजता जारी केलेल्या अहवालानुसार, खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासोबतच संगमेश्वरमधील शास्त्री आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड-भरणे पुलाजवळ जगबुडी नदीची धोका पातळी ७.०० मीटर आहे, मात्र सध्या नदी ७.४० मीटर या धोकादायक पातळीवरून वाहत आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने खेड शहर आणि परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर संगमेश्वर-शास्त्री पुलाजवळ शास्त्री नदीने ६.२० मीटरची इशारा पातळी ओलांडली असून, ती सध्या ६.४० मीटरवरून वाहत आहे. राजापूर पुलाजवळ कोदवली नदीची पाणी पातळीही ४.९० मीटरच्या इशारा पातळीपेक्षा जास्त, म्हणजेच ५.२० मीटरवर पोहोचली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावरील नागरिकांना प्रशासनाने अत्यंत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, चिपळूण येथील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील सोनवी, लांजा येथील काजळी आणि मुचकुंदी यांसह जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 18/Aug/2025