राजापूर : प्रदीर्घ काळ केलेल्या मागणी नंतर कोकण रेल्वे प्रशासनाने अखेर नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड स्थानकात थांबा दिल्यानंतर १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी राजापूर स्थानकात थांबलेल्या नेत्रावती एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी नेत्रावती एक्सप्रेच्या मोटारमनचा सत्कार केला.
कोकण रेल्वे मार्गांवर राजापूर तालुक्यासाठी राजापूर हे एकमेव परिपूर्ण असे स्थानक असून सध्या या स्थानकावर कोकणकन्या, मांडवी, तुतारी, नागपूर -मडगाव, उधना, दिवा सावंतवाडी अशा ट्रेन थांबतात. मात्र या तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार राजापूर स्थानकात नेत्रावतीसह जनशताब्दीला थांबा मिळावा, अशी मागील अनेक वर्षात सातत्याने मागणी होत होती. मात्र त्याला यश येत नव्हते. अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर मागणी केलेल्या गाड्यांपैकी नेत्रावतीला राजापूर रोड स्थानकात थांबा देवून समस्त राजापूरकरांची मागणी पूर्ण केली आहे.
ही गाडी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्टपासून राजापूर रोड स्थानकात थांबू लागली आहे. यानुसार शुक्रवारी (१५ ऑगस्ट) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटलेली नेत्रावती एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी परिसरातील अनेक नागरिक रेल्वेस्थानकात उपस्थित होते. मात्र ट्रेनला होणारा विलंब तसेच पडत असलेला जोरदार पाऊस आणि रेल्वे स्थानकातील अंधार यामुळे उपस्थित असलेल्या नागरिकांनी राजापूर रोड स्थानकातील स्टेशन मास्तर यांचा सत्कार केला होता. त्या नंतर रात्री आपल्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने म्हणजे रात्री दहाच्या दरम्यान नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात दाखल झाली.
दरम्यान, शनिवारी त्रिवेन्द्रमकडून मुंबईकडे जाणारी ट्रेन राजापूर स्थानकात थांबल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष करीत नव्याने थांबा मिळालेल्या नेत्रावती एक्स्प्रेसचे स्वागत केले. यावेळी राजापूर रोड रेल्वे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बंड्या शिंदे, संजय लाड, अनिल गुरव, बाबू कोरेगावकर, रमेश सौदळकर, सुनील पोटले, विकास पोटले, विलास कपाळे, सुभाष पिटळेकर, प्रदीप पुजारी, किशोर तांबे, बबन तांबे, इम्तियाज नाईक, प्रवीण नकाशे, कैलास मगदूम यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह राजापूर रोड स्थानकात भेट देवून शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 18/Aug/2025














