गोपाळकाला संपला, घरी जा सांगितल्याचा रागातून तरुणाला मारहाण; दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा

रत्नागिरी : गोपाळकाला उत्सव संपला तुम्ही तमच्या घरी जा असे सांगितल्याच्या रागातून एकाला तिघांनी शिवीगाळ करत दगड व हातांच्या थापटांनी मारहाण केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास पाजपंढरी दापोली येथे घडली आहे. याप्रकरणी संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश धर्मराज चोगले (४०, रा. मलखांबपेठ, दापोली), विनोद जनार्दन चोगले (४२, रा. पाजपंढरी, दापोली) आणि प्रमोद रमेश चोगले (३८, रा. पाजपंढरी दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात हेमंत कृष्णा चोगले (४५, रा. पाजपंढरी वाडीमंडळी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, तिन्ही संशयित हे दारुच्या नशेत गोपाळकाला कार्यक्रमाला आले होते.

कार्यक्रम संपल्यानंतरही ते बाजा वाजवणाऱ्या लोकांना जाणून-बूजून वाद्य वाजवण्यास सांगू लागले. यावर फिर्यादीने त्यांना गोपाळकाला उत्सव संपला असून तुम्ही तुमच्या घरी जा असे सांगितले. तरीही ते घरी जाण्यास तयार नसल्याने फिर्यादीने वाद्य वाजवणाऱ्यांना त्यांच्यासाठी एक गाणे वाजवण्यास सांगितले. तरीसूध्दा संशयितांनी दारुच्या नशेत फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर फिर्यादीने त्यांना मला शिवीगाळ करु नका, आता घरी जा असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने संशयित योगेश चोगलेने एक दगड हातात घेउन तो फिर्यादीच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. त्यानंतर इतर दोन संशयितांनीही फिर्यादीला मारहाण करत तुला मारुन समुद्रात टाकून देउ अशी धमकी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 18/Aug/2025