दापोलीत मुसळधार; असोंड गावात रस्ता गेला वाहून

दापोली : दापोली तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बर्‍याच दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा नव्या जोमाने जोरदार हजेरी लावली असल्याने पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

रविवारी तालुक्यातील असोंड गावातील वाडीअंतर्गत कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. यावर्षी या रस्त्याचे डांबरीकरण केले होत, तर या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मोर्‍या टाकण्यात आल्या होत्या. मात्र या पावसाने नवीन तयार केलेला रस्ता मोर्‍यांसह वाहून गेला, तर दापोलील-उन्हवरे मार्गावर असोंड नदीजवळ रस्त्यालगतची दरड कोसळली आहे. गावतळे मार्गे दापोलीकडे येणार्‍या आपटी-टाळसुरे नदी पुलावरून पाणी जात असल्याने काहीकाळ येथील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी परतावे लागले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 18-08-2025