दापोली, १८ ऑगस्ट २०२५:
दापोली तालुक्यातील शिर्दे गावात एका चिरेखाणीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान घडली.
याप्रकरणी चिरेखाण व्यावसायिक प्रदीप गणपत जामसदकर (वय ४०, रा. शिवाजीनगर, साखळोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जामसदकर यांची शिर्दे गावातील सर्व्हे क्रमांक २२/४ मध्ये चिरेखाण असून, तिथेच त्यांचे साहित्याचे गोडाऊन आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गोडाऊनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेले चिरेखाणीसाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे साहित्य चोरून नेले. यामध्ये १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या मालाचा समावेश आहे.
चोरीला गेलेले साहित्य:
१५ एच.पी.च्या चार मोटारी (किंमत: ₹८०,०००)
कटरचे दोन एक्सेल (किंमत: ₹२०,०००)
चार डायमंड कटर (किंमत: ₹४०,०००)
२०० मीटर लांबीची आर्मर्ड केबल (किंमत: ₹३०,०००)
२०० मीटरच्या दोन रिमोट केबल (किंमत: ₹२५,०००)
या घटनेप्रकरणी दापोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियमाच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, अधिक तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 18-08-2025














