चिपळूण : कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत महिलेनेच केली महिलेची फसवणूक

रत्नागिरी : आठ दिवसात १० लाखांचे कर्ज काढून देण्याची बतावणी करत महिलेनेच महिलेची ५० हजारांची फसवणूक केली. ही घटना १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वा. सुमारास चिपळूण येथील भोम मधलीवाडी येथे घडली आहे. याबाबत रोहिणी रुपेश चव्हाण (५२, रा. भोम मधलीवाडी चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिलेने फिर्यादी महिलेला महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र स्किम अंतर्गत ८ दिवसात कर्ज काढून देते असे आमिष दाखवले.

त्यानंतर फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन तिला १० लाखांचे कर्ज काढून देण्यासाठी तिच्याकडून ५० हजार रुपये घेतले. या घटनेला ९ महिने उलटल्यानंतरही कर्ज न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या महिलेने १६ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 18/Aug/2025