खेड, १८ ऑगस्ट:
खेड-दापोली मार्गावर फुरुस येथील सुखदर फाट्याजवळ चुकीच्या बाजूने आलेल्या टाटा मॅजिक गाडीने मारुती डिझायरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात डिझायरचालक जखमी झाला आहे. ही घटना काल (दि. १७) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी टाटा मॅजिक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंडारी हे आपल्या मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर (क्र. एम.एच.१७ बी.व्ही. ५७८९) गाडीने मुंबईहून दापोलीकडे जात होते. दुपारी दीडच्या सुमारास ते फुरुस येथील सुखदर फाट्यावरील मोरीवर आले असता, समोरून उतारावर असलेल्या टाटा मॅजिक गाडीचा (क्र. एम.एच.०८ झेड २२९८) चालक सागर नलावडे याने आपले वाहन निष्काळजीपणे चुकीच्या बाजूला आणले.
चुकीच्या दिशेने आलेल्या मॅजिक गाडीने भंडारी यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात भंडारी यांना दुखापत झाली असून, त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी, टाटा मॅजिक चालक सागर आनंद नलावडे (रा. महात्मा फुले नगर, खेड) याच्याविरोधात खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 18-08-2025














