चिपळूण नगर पालिकेच्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे २० रोजी बक्षीस वितरण

चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने चिपळूण नगर परिषदेतर्फे आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक मुक्त चिपळूण’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘होम मिनिस्टर’ खेळ, मानाची पैठणी आणि सोन्याची नथ यांसह बक्षीस वितरण समारंभ २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.

या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. शेखर निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेते, चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता दूत ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात कुपनमधून निवडलेल्या लकी ड्रॉ विजेत्या महिलेला मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. त्याच दिवशी विशेष ‘होम मिनिस्टर’ खेळाचे आयोजन असून अंतिम विजेती महिला सोन्याच्या नथीची मानकरी होईल. याशिवाय ‘राखणदार’ या कचरा व प्लास्टिकमुक्तीवर आधारित जनजागृती करणाऱ्या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन हा कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

१५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. महिलांनी प्लास्टिक दिल्यानंतर त्यांना कुपन देण्यात आली. आता या स्पर्धेत सहभागी महिलांमधून लकी ड्रॉची व नथीची मानकरी ठरवण्यात येणार आहे.

Cake of the day

तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी योगदान देण्याचे आवाहन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 18/Aug/2025