रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, २४ तासांत १३४ मिमी पावसाची नोंद; चिपळूण, लांजा, रत्नागिरीने ओलांडली वार्षिक सरासरी!

रत्नागिरी, १८ ऑगस्ट:
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सरासरी १३४.१४ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे, तर खेड तालुक्यात सर्वाधिक १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्यमान अहवालानुसार, आज (दि. १८) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्याच्या सर्वच भागांत अतिवृष्टी झाली. खेड तालुक्यात सर्वाधिक १७० मिमी, दापोलीत १५४ मिमी, तर चिपळूणमध्ये १४७.११ मिमी पाऊस कोसळला. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

तीन तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत लांजा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११४.५५% पाऊस झाला आहे. त्याखालोखाल चिपळूण तालुक्यात १०४.१६% आणि रत्नागिरी तालुक्यात १००.३०% पावसाची नोंद झाली आहे. गुहागर (९५.९५%), संगमेश्वर (९३.८९%) आणि राजापूर (९३.२२%) हे तालुकेही वार्षिक सरासरीच्या जवळ पोहोचले आहेत. जिल्ह्याने आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९६.८३% पाऊस अनुभवला आहे.

Radhakrushna patapedhi

गेल्या वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यात केवळ ६.८६ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्या तुलनेत यंदा एकाच दिवसात जवळपास वीस पटीने अधिक पाऊस कोसळला आहे. याच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 18-08-2025