खेड, १८ ऑगस्ट:
खेड तालुक्यातील सवेणी येथे महिनाभरापूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नितीन सुरेश गुजर (वय ४३, रा. सवेणी, सिमेचीवाडी) यांनी पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ जुलै रोजी मयत तरुण आपल्या दुचाकीवरून सवेणी गावातून जात होता. यावेळी त्याची दुचाकी समोर असलेल्या एका चारचाकी वाहनाला पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला होता.
अपघातानंतर त्याला तातडीने कराड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने आणि प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला दि. १५ जुलै रोजी पुढील उपचारांसाठी मुंबईतील कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे त्याच्यावर जवळपास महिनाभर उपचार सुरू होते. मात्र, अखेर दि. ६ ऑगस्ट रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सवेणी गावावर शोककळा पसरली आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 18-08-2025














