दापोली पोस्ट कार्यालयात केवळ १ लाख देयक मर्यादा

दापोली : पोस्टाच्या कारभाराबाबत दिवसेंदिवस महिलांमध्ये नाराजी दिसत आहे. दापोली शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात गेल्या आठवड्यापासून लाभार्थ्यांची पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागत आहे. शासनाच्या विविध योजनेतील पीएम किसान, घरकुल, लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजना यासारख्या महत्त्वाच्या योजनांची रक्कम लाभार्थ्याच्या पोस्टातील बचत खात्यात जमा होते. ही रक्कम काढण्यासाठी दापोली पोस्ट कार्यालयात लाभार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र या पोस्ट कार्यालयातून दररोज केवळ १ लाख रुपयेच दिले जात असल्याने अनेक लाभार्थ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे. त्यामुळे महिला आणि वयोवृद्ध मंडळी संताप व्यक्त करत आहेत.

दापोली पोस्ट कार्यालयात दररोज फक्त १ लाख रुपयेच देयके इतकाच मर्यादित आहे. त्यातच नेटवर्कचा सतत बिघाड आणि केवळ एकाच काऊंटरवर सर्व व्यवहार होत असल्याने रांगा वाढत आहेत. पहाटेपासून रांगेत थांबूनही दुपारी पैसे संपले असे काऊंटरवरील कर्मचाऱ्यांकडून सांगितल्यावर अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागते. त्यामुळे दापोली पोस्ट कार्यालयाची १ लाखाची मर्यादा वरिष्ठ कार्यालयाने वाढवून द्यावी अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात दापोलीचे पोस्टमास्तर म्हणाले की, निधी वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे पाठवली आहे, मात्र अद्याप त्याला वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिलेली नाही. नेटवर्क समस्या देखील कायम असल्याने कामकाजात मोठा विलंब होतो आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 18/Aug/2025

Cake of the day