शून्य अपघात, सुरक्षित महामार्गाचे ध्येय : अपर पोलिस महासंचालक वाहतूक प्रवीणकुमार साळुंखे

पाली : गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिस कार्यरत राहतील. यंदा शून्य अपघात व सुरक्षित महामार्ग ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अपर पोलिस महासंचालक वाहतूक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले.

महामार्ग वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीणकुमार साळुंखे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील बंदोबस्त तसेच येणाऱ्या भाविकांना कोणत्या अडचणी निर्माण होतील याची पाहणी केली. यावेळी रायगड परिक्षेत्र महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, पनवेल विभाग पोलिस निरीक्षक भरत शेंडगे, रायगड विभाग पोलिस निरीक्षक विनोद माउने, रत्पानिये विभाग पोलिस निरीक्षक जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राणी पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनंत पवार उपस्थित होते. वाकण, महाड, कशेडी या तिन्ही मदत केंद्रांवर पोलिस निरीक्षक विनोद माळवे, चिपळूण, हातखंबा, कसाल येथे पोलिस निरीक्षक दीपाली जाधव यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मदत केंद्रात असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत अडचणींबाबत साळुंखे यांनी चर्चा केली. तसेच गणपतीसाठी येणाऱ्या भाविकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी त्यांनी पाहणीही केली. त्याठिकाणी लवकरात लवकर रस्ता वाहतुकीसाठी कसा सुरळीत करता येईल यावर संबंधित एजन्सीबरोबर चर्चाही केली. जड वाहतूक उभ्या करून ठेवण्याच्या जागांची त्यांनी पाहणी केली.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी क्रेन मालक आणि क्रेन चालक यांचे संपर्क क्रमांक, नाव, ठिकाण याची माहिती तसेच मृत्यूजय दुतांबाबतची प्रत्येक टेंबबॉईजचे गट कोणत्या ठिकाणी उपलब्ध असणार याची माहिती अद्ययावत ठेवा, अशा सूचना साळुंखे यांनी दिल्या आहेत.

रस्ते देखभाल दुरुस्तीची सुरू असलेल्या कामांची ठिकाणे, एसटी बसस्थानकांचे संपर्क क्रमांक, वाहतूक पार्किंगच्या जागा, ढाबे, प्रसाधनगृहे तसेच हॉटेल्स याची माहिती असलेले फलक ठिकठिकाणी उभारण्यास त्यांनी सांगितले. याबाबतचे तक्ते तयार करून महामार्गावर लावण्यास सांगितले. त्यात पोलिस ठाणे, सीएनजी पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन केंद्र, टोईंग कारवाले, अग्निशामन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, हेल्पलाईन नंबर आणि राष्ट्रीय महामार्गांवरील चालक-मालक संघटना अशांची नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Hotel star caters

२० ऑगस्टला पुन्हा आढावा
मदत पोलिस केंद्राच्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट, बॉटल नेक पॉईट याची माहिती व उपाययोजना, हदीमध्ये असलेली पोलिस ठाणी व तेथे असणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांचे मोबाईल नंबर याची यादी तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. या सर्वांचा आढावा २० रोजी ते पुन्हा घेणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 18/Aug/2025