चिपळूण : गर्भाशयातील ३.७७५ किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

खेड : गर्भाशयातील तीन किलोची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात करण्यात आली. यामुळे महिलेला जणू नवजीवन लाभले. रायगड जिल्ह्यातील महाड येथील महिला गेल्या वर्षभरापासून मासिकपाळीचा त्रास, पोटदुखीमुळे त्रस्त होती. त्याशिवाय शरीरातील रक्तही फार कमी होऊन वजन घटले होते. या तक्रारी साधारपणे चाळीशीच्या बऱ्याच स्त्रियांना असतात म्हणून सुरवातीला थोडे दुर्लक्ष केले. पण, नातेवाइकांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबईत तपासणी करून घेतली. पण, तिथे मात्र गर्भाशय किंवा अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त करत एम. आर. आय. चाचणीचा सल्ला दिला गेला. त्यानंतर त्यांना मुंबईतील मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, तिथे तपासणीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्या महिलेच्या कुटुंबीयांनी चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालय गाठले.

वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागेचच एम. आर. आय. तपासणी झाली आणि त्यात ही गाठ गर्भाशयातील फायब्रोइड (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. हे निदान झाल्यानंतर प्रणालीला हायसे वाटले; पण हिमोग्लोबिन फक्त सहा ग्रॅम असल्याने तीन बाटल्या रक्त देऊन आधी तब्बेत सुधारण्यासाठी प्रयत्न झाले.

लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण गर्भाशय, दोन्ही अंडाशय आणि नलिका काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. रक्षा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी गोरे आणि डॉ. निहारिका राऊळ यांच्या सहायाने पार पडली. शस्त्रक्रिया दीड तास चालली आणि त्यांच्या पोटातून आठ महिन्यांच्या गर्भासारखी दिसणारी तब्बल ३.७७५ किलोची ३० बाय ३० सेंटिमीटर एवढी मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. आता प्रणालीची तब्बेत सुधारते आहे. पोटदुखी आणि मासिक पाळीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे.

फायब्रॉईड हा दर पाच स्त्रियांमागे एकाला होणारा आजार आहे. ही गाठ गर्भाशयातील स्न्यायुची असते आणि ह्यात कॅन्सर असण्याची शक्यता फार कमी असून, प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये दिसून येते. त्यामुळे घाबरून न जाता त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. – डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका, वालावलकर रुग्णालय

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 18/Aug/2025