रत्नागिरी : श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून देवरूख येथील गवळी समाज हॉल व माटे भोजने सभागृहात श्रीमद् भगवद्गीता वाटप व भागवत गीता पठणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
उमेश महाडिक यांनी संकल्प केलेल्या ‘एक लाख श्रीमद् भगवद्गीता वाटप’ या महाभियानांतर्गत या गीता वाटप व पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरशेठ माटे, बबन बंडागळे, गंगाराम टोपरे, बाळा पंदेरे, ह. भ. प. रमेश बंडागळे, महाडिक गुरुजी, प्रदीप चोगुले, वाजे गुरुजी आदी उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे आध्यात्मिक, नैतिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, गीतेतील शिकवण दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
श्रीमद् भगवद्गीतेचे वाटप करून गीतेचा प्रसार व प्रचार हा खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचा मार्ग असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान गीतेचे सामूहिक पठण करण्यात आले. गीतेचे पठण व श्रवण करताना सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमामुळे समाजामध्ये धर्म, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा यांचे संवर्धन होऊन गीतेचा संदेश पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा उद्देश साधला गेल्याचे आयोजक मंडळाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 18-08-2025













