चिपळूण : आपला रस्ता आपणच मोकळा करायला हवा. कुणीतरी आपल्यासाठी मार्ग तयार करेल याची वाट पाहत बसलो तर आयुष्य पुढे सरकत नाही. सावित्रीबाई फुले यांनी विरोध करणाऱ्यांना सामोरे जाऊन स्वतःसाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी रस्ता मोकळा केला नसता तर आजच्या स्त्रिया विज्ञान, शिक्षण, प्रशासन, कला, साहित्य, खेळ अशा प्रत्येक क्षेत्रांत आघाडीवर दिसल्या नसत्या. स्त्री-पुरुष समानतेची चर्चा महत्त्वाची असली तरी त्या आधी तरी महिला-महिला एकत्र याव्यात, एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहाव्यात हा पहिला टप्पा असायला हवा, असा ठाम आणि विचारप्रवर्तक संदेश नामवंत लेखिका कवयित्री डॉ. नीलम माणगावे यांनी व्यक्त केला.
श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘छोट्या माणसांच्या मोठ्या गोष्टी’ हा विषय घेऊन त्यांनी सामान्य, अशिक्षित, साध्या माणसांच्या आयुष्यातून शिकता येणाऱ्या जीवनमूल्यांचा प्रभावी वेध घेतला. मंजुश्री चितळे यांनी देवस्थानच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. समाजातील भेदभावाचे वास्तव अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला, विधवा स्त्रीला सण-उत्सव, शुभकार्यांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही; पण पुरुष विदुर झाल्यावर त्याला असा सामाजिक बहिष्कार का दिला जात नाही? त्यांनी सांगितले की, महिलांनी स्वतःची वाट स्वतः तयार करण्यासाठी उभे राहिले पाहिजे अन्यथा समाजाच्या रूढी व प्रथा त्यांना कधीच पुढे जाऊ देणार नाहीत. कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
…तर वृद्धाश्रम कमी होतील
स्त्रियांच्या प्रतिमेबाबत समाजातील भेद लक्षात आणून देताना त्या म्हणाल्या, जेव्हा आपण स्त्रीकडे आई म्हणून पाहतो, तेव्हा तिच्याप्रति आदर, प्रतिष्ठा, सन्मान निर्माण होतो; पण तीच स्त्री ‘बाई’ म्हणून पाहिली की, आपला दृष्टिकोन अचानक बदलतो. हा बदल घातक आहे त्यामुळे स्त्रीकडे सर्वप्रथम माणूस म्हणून पाहिले पाहिजे. तरुण आणि वृद्ध यांच्या विचारांतील दरी भरून काढणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विचारभेद दूर झाले तर वृद्धाश्रमांची संख्या आपोआप कमी होईल. पिढ्यांमध्ये संवाद, समजूत आणि आपुलकी वाढवली पाहिजे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 18/Aug/2025














