लांजा : कोत्रेवाडी येथे वाडी वस्तीगत आणि शासकीय नियम धाब्यावर बसून प्रास्तावित असलेल्या डंपिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी १४ ऑगस्ट पासून छेडलेले उपोषण सोमवारी सलग पाचव्या दिवशी सुरूच असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
कोत्रेवाडी येथे लांजा नगरपंचायतीच्या वतीने डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित आहे. वाडी वस्ती लगत असून जवळ जलस्त्रोत आहेत. तसेच जागेकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. असे असतानाही नियम पायदळी तुडवून आणि लोकसभेच्या आचारसंहिता काळात घाईगडबडीने या जागेचे खरेदीखत करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावण्याच्या या प्रकारा विरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाचा आज सोमवारी सलग पाचवा दिवस असून अद्यापही शासनाकडून कोत्रेवाडी ग्रामस्थांना अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ढिम्म प्रशासन जर आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही देखील हे उपोषण मागे घेणार नाही. नगर पंचायत प्रशासन जर कोत्रेवाडी येथील जागेवरच डम्पिंग ग्राउंड करण्यासाठी आग्रही असेल तर आम्ही देखील मागे हटणार नाही. आम्ही आमचे जनजीवन उध्वस्त होवू देणार नाही. म्हणूनच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही आमचे उपोषण चालूच ठेवणार असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 18/Aug/2025












