मंडणगडातील भारजा नदीला पूर

मंडणगड : मंडणगड तालुक्यात सोमवारी (दि. १८) अतिवृष्टीने तालुक्यातील भारजा नदीला पूरस्थिती निर्माण झाली. भारजा नदीवर असलेल्या चिंचघर – मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने या मार्गे दापोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विसापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने खेड, दापोलीकडे जाणारी वाहतूकही काही काळ खोळंबली होती. भारजा व निवळी या नद्यांसह छोटे मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यात मागील तीन दिवस पावसाची संततधार सोमवारी मात्र वाढली. सोमवारी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन मात्र विस्कळीत झाले.

सोमवारच्या धुव्वाधार पावसात तालुक्यातील नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते, मंडणगड शहराच्या नजीक असलेल्या भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाजवळील ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. काही हौशी मंडळी या मार्गावरून धोका पत्करून वाहतूक करत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले, तालुक्यातील भारजा, निवळी या नद्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. चिंचघर-मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. यामुळे जावळे, आंबवली, वेळास मार्ग बंद झाला तर मंडणगड ते खेड व दापोलीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर विसापूर येथील नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील मंडणगडमधून खेड व दापोलीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.

शहरातील परिवार पार्क जवळील रस्त्यावर गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने पाण्याबरोबर रस्त्यावर वाहून आलेली माती, गाळ व मोठ्या खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या गटाराचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 19/Aug/2025

Tata sierra