राजापूर : राजापूर तालुक्यातील भू ग्रामपंचायतीमधील लिपिकाला अधिका-यांसमोरच काही ग्रामस्थांनी जातीवाचक शिविगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अनिल शंकर सरफरे, अमित रमाकांत सरफरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र कृष्णा जाधव (वय ५५ रा. भू बौध्दवाडी राजापूर) हे भू ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याबाबतची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता सरफरेवाडीतील रस्त्यावरील वादाच्या पाहणीसाठी गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, प्रशासक पी. वाय. सावंत, ग्रामसेवक प्रशांत कांबळी व संबंधित अधिकारी भू ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर सर्वजण रस्त्यावरील बांधाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या अनिल शंकर सरफरे यांनी नरेंद्र जाधव यांच्यावर ‘रेकॉर्डची वाट लावली’ असा आरोप करत जातीवाचक शिविगाळ केली.
शुक्रवारी राजापूर तालुका बौध्दजन संघ ग्रामीणचे अध्यक्ष महादेव गोठणकर व सचिव उमाकांत जाधव यांच्यासमवेत ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीवर धडक देत प्रशासक सावंत यांना धारेवर धरत जाब विचारला. लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी मानवाधिकारी संघटनेचे गाडे, डीवायएसपी माईनकर, पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३चे कलम ३५२, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती व जमात अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस) प्रमाणे अमित सरफरे व अनिल सरफरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 19/Aug/2025












