दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावरील पहिल्या मराठी पुस्तकाच्या लेखिकेशी थेट संवाद

रत्नागिरी : रत्नागिरीतील चित्रपटप्रेमींसाठी एका वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे चित्रपट आणि विचार त्यांच्या जीवनप्रवासातून उलगडून दाखवण्यासाठी रत्नागिरी फिल्म सोसायटीतर्फे एका विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम मारुती मंदिर येथील हॉटेल विवामध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात श्याम बेनेगल यांच्यावर मराठीतून पहिले अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका डॉ. सविता नायक मोहिते यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. श्याम बेनेगल यांनी आपल्या कलात्मक आणि आशयघन चित्रपट व मालिकांमधून भारतीय सिनेसृष्टीवर एक वेगळा ठसा उमटवला. मानवी स्वभावाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वावर आतापर्यंत केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच साहित्य उपलब्ध होते. डॉ. सविता नायक मोहिते यांनी ही उणीव भरून काढत ‘श्यामबाबू’ यांचा जीवनपट मराठी वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.

डॉ. मोहिते यांच्याकडून श्याम बेनेगल यांच्यासोबतचे प्रत्यक्षदर्शी अनुभव, त्यांच्या चित्रपटांमागील भूमिका आणि त्यांचे विचार ऐकण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सर्व cinéphiles नी (चित्रपटप्रेमींनी) सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी फिल्म सोसायटीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 19-08-2025