रत्नागिरी : तालुका शालेय कुस्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका शालेय फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा काल (सोमवार, दि. १८ ऑगस्ट) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात आणि विक्रमी प्रतिसादात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील २०० हून अधिक भावी पैलवानांनी सहभाग नोंदवत कुस्तीचा आखाडा दणाणून सोडला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूवृत्ती, जोश आणि ग्रामीण भागातील शाळांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. गजानन (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्राताई राजेशिर्के, तालुका क्रीडा समन्वयक श्री. विनोद मेयेकर, स्पर्धा प्रमुख श्री. तुफिल पटेल यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिस्तबद्ध आयोजनामुळे या स्पर्धा लक्षवेधी ठरल्या. पंच म्हणून श्री. गलांडे सर, श्री. कदम सर, श्री. भावेश सावंत यांनी, तर गुणलेखनाची जबाबदारी प्रसिद्ध कुस्तीपटू स्वप्निल घडशी यांनी सांभाळली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक क्रीडाशिक्षकांनी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

या स्पर्धांमधून अनेक उदयोन्मुख कुस्तीपटू जिल्हास्तरावर रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुस्ती या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्याचे मत मान्यवरांनी आणि उपस्थितांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 19-08-2025