राजापुरात लोकवर्गणीतून पोलिस चौकी उभारणार; गाळ निर्मूलन समितीचा निर्णय

राजापूर : शहरातील गाळ निर्मूलन समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत नागरी उपक्रमांतर्गत लोकवर्गणीतून जमा असलेल्या उर्वरित निधीतून जवाहर चौक येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकरिता दर्जेदार चौकीची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी नाम फाऊंडेशन तसेच इमेन्स फाऊंडेशन व शहरातील जागरूक नागरिकांच्या लोकवर्गणीतून कोदवली नदीतील गाळ उपसण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

या उपक्रमाला शहरातील नागरिक, व्यापारी संघ तसेच विविध संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या ड्राईव्हमध्ये शहराची एकजूटही दिसून आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी गाळ उपशासाठी शासकीय पातळीवरून निधी उपलब्ध करून दिल्याने शासन स्तरावरून हे काम हाती घेण्यात आलेले होते.

गाळ उपशामुळे पुराच्या पाण्याची तीव्रता कमी होण्यास मदत झाल्याने त्याचा फायदा शहराला झालेला असल्याचेही दिसून येऊ लागले आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दोन नद्यांमधील गाळ उपसण्याकामी झालेल्या व दोन वर्षापूर्वी राबवण्यात आलेल्या उपक्रमाच्या जागृतीत अनेकांनी लोकवर्गणी देत प्रत्यक्षात या मोहिमेत सहभाग दर्शवली होती.

अशा जागरूक नागरिकांना बुधवारच्या बैठकीत धन्यवाद देण्यात आले. तसेच जमा-खर्चाचा हिशोब सादर करण्यात आला. या हिशोबामध्ये दोन लाख १७ हजारांची लोकवर्गणी शिल्लक असल्याने व ही रक्कम शहरवासियांची असल्याने त्याचा व्यापक दृष्टीने शहराला उपयोग व्हावा या उद्देशाने त्याचा विनियोग व्हावा अशी कल्पना बैठकीत मांडण्यात आली. त्यावर शहरवासीय व तालुक्याबाहेरून दररोज शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जवाहर चौक भागात पोलिस चौकीची गरज विषद करण्यात आली. त्यावर विचारविमर्ष करण्यात येऊन उर्वरित रकमेतून चौकीची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जमा-खर्चाची माहिती साई किरण कोठारकर यांनी सर्वांना दिली. या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, डॉ. उत्तम प्रभुदेसाई, इमेन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मजिद पन्हळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ, राजापूर येथील रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 19/Aug/2025