रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता घरादारांवर संकट आणले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने, संरक्षण भिंती कोसळल्याने आणि अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नुकसानीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यात घरे, गोठे आणि संरक्षण भिंती कोसळण्याच्या घटना सर्वाधिक आहेत.
दापोली तालुक्यात सर्वाधिक नुकसान
दापोली तालुक्यात नुकसानीची तीव्रता सर्वाधिक आहे. केळशी येथे एका कंपनीच्या पाईपलाईनमध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत एका घराचे तब्बल ५.५० लाख रुपयांचे नुकसान झाले. तर पाजपंढरी गावात दरड कोसळून दोन घरांचे मिळून अडीच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याशिवाय कॅम्प दापोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची ३० फूट लांब भिंत कोसळून सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
इतर तालुक्यांमध्येही गंभीर स्थिती
मंडणगडमध्ये एका घराचे पूर्णतः नुकसान होऊन दीड लाखाचा फटका बसला आहे. संगमेश्वरमध्ये झाड कोसळून एका घराचे ६० हजारांचे नुकसान झाले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रत्नागिरी, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्येही अनेक ठिकाणी झाडे पडून आणि भिंती कोसळून घरांचे २५ हजार ते ७५ हजारांपर्यंत नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 19-08-2025












