रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, पूरस्थिती आता अधिकच गंभीर बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाने आज (मंगळवार) सकाळी ११:३० वाजता जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, खेड येथील जगबुडी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खेड शहरावर पुराचा मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.
पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, जगबुडी नदीची धोका पातळी ७.०० मीटर आहे. सकाळी ११:३० वाजता नदीने ही पातळी ओलांडून ७.१० मीटरची उंची गाठली आहे. यामुळे खेड शहर आणि नदीकाठच्या सखल भागातील गावांमध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदी ५.६८ मीटरवर पोहोचली आहे, तर राजापूरमधील कोदवली नदी ७.५५ मीटरवर वाहत आहे. या दोन्ही नद्या इशारा पातळीच्या खूप वर असल्याने चिपळूण आणि राजापूरमध्येही पूरस्थिती गंभीर बनली आहे. संगमेश्वरमधील शास्त्री आणि बावनदी या नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली असून, जिल्ह्यातील पूरस्थिती चिंताजनक बनली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 19-08-2025












