संगमेश्वर : सूरज धावडेंसह कलाकारांनी साकारलेल्या राज्याभिषेक सोहळ्याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळेसारख्या ग्रामीण भागात जन्मलेले व घडलेले कलाशिक्षक सूरज दत्ताराम धावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या रांगोळीची नोंद जगातील सर्वात मोठी रांगोळी म्हणून झाल्याचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घोषित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रोहा-रायगड येथे ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली होती.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची १,२५,००० चौरस मीटर आकाराची रांगोळी साकारण्यासाठी १०० कलाकारांनी एकत्र येऊन ५ हजार किलो रांगोळी वापरत ७० तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली होती.

वांझोळे गावचे माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक दत्ताराम धावडे यांचे सूरज हे सुपुत्र आहेत. सूरज यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वांझोळे, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय वांझोळे आणि पुढील शिक्षण आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातून २००९ मध्ये १२वी वाणिज्य शाखेतून झाले. २०१४ मध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयातून गव्हन्मेंट ड्रॉईंग डिप्लोमा इन ड्रॉईंग अँड पेंटिंग (जी. डी. आर्ट) उत्तम गुणांनी पूर्ण केला. त्यानंतर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे कलाशिक्षक म्हणून ६ वर्षे काम केले. आता सध्या दिल्ली पब्लिक स्कूल पुणे येथे गेली २ वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सूरज यांच्या चित्रांची महाराष्ट्र कला प्रदर्शनास सलग दोन वर्ष विद्यार्थी गटातून निवड झाली होती. कॅमल आर्ट फाउंडेशनच्या कला प्रदर्शनासाठी २ वेळा निवड झाली होती, यामध्ये ते एकदा विद्यार्थी गटातून तर दुसऱ्या वेळी व्यावसायिक गटातून सहभागी झाले होते. व्ही. व्ही. ओक राष्ट्रीय कला प्रदर्शन, पुणेकरिता सलग २ वर्ष, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनातील व्यावसायिक गटातून २ वेळा तसेच दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अ. भा. कला प्रदर्शनातील व्यावसायिक गटात निवड झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 19/Aug/2025