चिपळूण : शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथून रविशंकर कांबळे याला पोलिसांना ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा ६ ऑगस्टला खून झाल्याचे उघड झाले. त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणी जोरदार तपासाची सूत्रे हलवली. अनेकांचे जाब जबाब नोंदवले व ट्रव्हल एजंट जयेश गोधळेकर याला त्याच दिवशी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या प्रकरणात अन्य एक साथादीर असल्याचे पुढे आले. यानंतर दुसरा आरोप रविशंकर कांबळे याचा शोध सुरू झाला. तो मूळचा सातारा येथील होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात तो सातारा येथे आढळून आला नाही. यानंतर त्याच्या फोनचे सीडीआर मिळवण्यात आले. त्यामध्ये तो अनेकदा कर्नाटकमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. चिपळूण पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली. त्यानंतर चिपळूण पोलिसांचे पथक कर्नाटकात दाखल झाले. कलबुर्गी ही त्याची सासरवाडी होती. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन शोध केला. मात्र तो सापडत नव्हता.
त्यामुळे सासरवाडीमध्ये त्याची पत्नी आणि मेव्हणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपी कांबळेचा पत्ता मिळवला आणि त्याला ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी त्याला चिपळूणमध्ये आणून न्यायालया समोर हजर केले असता त्याला सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी जेरबंद झाले असून लवकरच गेलेले सोने चांदीचे दागिणे तसेच या प्रकरणात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. या तपास कार्यात सहायक पोलिस निरीक्षक ओम आगाव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 19/Aug/2025












