रत्नागिरी:
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या ‘कांचन डिजिटल’ तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आणि अल्पावधित अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धे’च्या सहाव्या पर्वाची घोषणा आज अंगारकी संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. यंदा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, गणेश मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा रत्नागिरी तालुकास्तरावर होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ६ हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. याशिवाय विशेष उल्लेखनीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत.
मूर्तिकारांच्या कलेला मिळणार प्रोत्साहन
यंदाच्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘सुबक गणेशमूर्ती’ या नव्या पुरस्काराची भर घालण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सजावटीमधील सुबक गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकाराला हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा हा एक अभिनव प्रयत्न आहे.
स्पर्धेत पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देण्यात आले असून, थर्माकॉल, प्लॅस्टिक आणि फ्लेक्सचा वापर टाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२५ आहे. गणेशभक्तांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करावे, असे आवाहन कांचन मालगुंडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ९४२२५७६७३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 19-08-2025












