चिपळूण नगर पालिकेच्या होम मिनिस्टर’मुळे १,७३० किलो प्लास्टिक जमा

चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी, चिपळूण यांच्या सहयोगाने चिपळूण नगर परिषदेने स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक मुक्त चिपळूण ही मोहीम मोठ्या जोमाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिलांसाठी खास चिपळूण होम मिनिस्टर ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३०१ महिलांनी सहभाग घेतला. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या एका महिन्याच्या कालावधीत महिलांनी मिळून १,७३० किलो प्लास्टिक जमा केले.

जमा झालेल्या प्लास्टिकच्या प्रत्येक पाव किलोला एक कुपन देण्यात आले. या माध्यमातून एकूण ६,९२१ कुपन्स वाटप झाले, तर १५ हून अधिक कुपन्स मिळवणाऱ्या महिलांची संख्या १८८ इतकी झाली. चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून ही अनोखी स्पर्धा राबविण्यात आली. शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी अभिनेता ओंकार भोजने याची ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने ही मोहीम यशस्वी होत असल्याचे समाधान मुख्याधिकारी भोसले यांनी व्यक्त केले. या स्पर्धेत सहभागी महिलांना जमा झालेल्या कुपन्सद्वारे पैठणी देण्यात येणार असून, ‘होम मिनिस्टर’ या खेळातून विजेत्या महिलेला सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

होम मिनिस्टर स्पर्धा २० रोजी
होम मिनिस्टर स्पर्धेचा पारीतोषिक वितरण सोहळा व होम मिनिस्टर स्पर्धा २० रोजी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रंगणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांच्यासह विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेता ओंकार भोजने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्रचे संचालक भाऊ काटदरे व मानस संसारे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 19/Aug/2025

Fitness