चिपळूण : येथील पालिकेत प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीचा भाग म्हणून आज प्रशासनाकडून रचना जाहीर प्रभाग करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. परिणामी, अंशतः बदल झालेल्या प्रभागात इच्छुकांमध्ये मतांच्या गणिताची बेरीज वजाबाकी आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे. यापूर्वी १३ प्रभागांमधून २६ नगरसेवकांची जनतेतून निवड करण्यात येत होती. १४ प्रभागांतून २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. म्हणजेच एका प्रभागाची वाढ झाली आहे. शहरात एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, २८ नगरसेवक या प्रभागांमधून निवडून दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होईल.
जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार, कोणत्या प्रभागात कोणते भाग येतील आणि त्यांची मतदार संख्या किती आहे याची सविस्तर माहिती प्रशासनाने जाहीर केली. यामध्ये ४३२२ मतदार संख्या असलेला पेठमाप हा सर्वात मोठा प्रभाग ठरणार आहे. ३५१८ लोकसंख्या असलेला पागमळा -वीरेश्वर कॉलनी प्रभाग सर्वात लहान ठरला आहे. पालिका प्रशासनाच्या या घोषणेनंतर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी निवडणूक समीकरणांचा विचार सुरू केला आहे.
चिपळूण पालिकेची प्रभाग रचना भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. नागरिकांना त्यात काही शंका असेल तर ३१ ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. मुदतीत आलेल्या हरकतींचा विचार केला जाईल- विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 20/Aug/2025












