रत्नागिरी : ११५ एसटी वाहक तपासणी पथकाच्या जाळ्यात

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध मार्गावर नियमित पथकांकडून गाड्यांची तपासणी केली जाते. तपासणीत वाहक, प्रवासी दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात रत्नागिरी विभागातील ११५ वाहकांवर तिकिटाच्या पैशांमध्ये हेराफेरी केल्यामुळे पथकाच्या जाळ्यात सापडले. त्याच्यावर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली. एसटीतून फुकट प्रवास करणाऱ्या ३८ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एसटीमध्ये गर्दी असताना काही वाहक प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेतात; मात्र प्रवाशांना तिकीट न देता ते स्वतःच्याच खिशात घालतात. मधल्या थांब्यावर उत्तरलेल्या प्रवाशांकडचे तिकीट घेऊन नवीन प्रवाशांना दिले जाते व ते पैसे स्वतःकडे ठेवले जातात. काहीवेळा प्रवाशांना तिकीट तर दिले जाते; परंतु प्रवाशांनी दिलेल्या अधिकच्या पैशातून तिकिटाची रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत करत नाहीत. ड्यूटी संपल्यानंतर जमा झालेले पैसे आगारामध्ये जमा न करणे अशा विविध कारणास्तव वाहकांवर कारवाई केली जात आहे. रत्नागिरी विभागात गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे ११५ वाहकांवर कारवाई केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी असतात. तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या ३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९ हजार १८३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवाशांवर तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली जाते तर वाहक तपासणीत दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई होते.

रत्नागिरी विभागात सतत विविध मार्गांवर तपासणी पथक कार्यरत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह पैशाच्या हेराफेरीत सापडलेल्या वाहकांवरही दंडात्मक, कायदेशीर कारवाई केली जाते- – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 20/Aug/2025